Saturday, October 6, 2012

गणेशोत्सव २०१२ - संक्षिप्त वृत्तांत

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांचा आवडता उत्सव गणेशोत्सव अतिशय थाटात पार पडला. गणेशोत्सवापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी झटून तयारी केली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या पूजेने झाली. यंदा पूजा अतिशय निराळ्या प्रकारे झाली. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेची पोथी आणण्यात आली होती. तिच्या प्रती सर्व उपस्थितांना वाटण्यात आल्या. मधुर मोहोळे हिने पूजा केली तर अंकुर कुलकर्णीने पौरोहित्य केले. संपूर्ण पूजेतील श्लोक अध्वर्यू (पुरोहित) पाठोपाठ सर्व उपस्थितांनी सुद्धा म्हणले. तसेच पोथीमध्ये प्रत्येक श्लोकाखाली लिहिलेला मराठीतील अर्थ वाचण्यात आला. पूजेत सर्वांना सहभागी होता आल्यामुळे आणि मराठीतून समजावलेल्या अर्थामुळे उपस्थितांना हे वातावरण आवडले. पूजेनंतर आरती आणि प्रसाद वाटप झाले. तसेच त्यानंतर २१ वेळा अथर्वशीर्ष पठण झाले. सजावटीमध्ये गणपतीच्या निरनिराळ्या नावांमधून साकारलेली गणेशाची रेखाचित्रे लक्ष वेधून घेत होती. देखाव्यामध्ये रायगडाची प्रतिकृतीसुद्धा ठेवण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा आणि विसर्जन मिरवणूक झाली. गणेशोत्सवाची सांगता शनिवारी विविध-गुणदर्शन कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात नवीन आलेल्या सदस्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. कार्यक्रम नृत्य, नाटक, ठसकेबाज लावणी अश्या विविध कलाविष्कारान्मधून रंगत गेला. शेवटी नवीन समितीची घोषणा झाली आणि त्यानंतर उकडीच्या मोदकांसहित सुग्रास जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला.

No comments:

Post a Comment