Activities/उपक्रम

IISc मराठी  मंडळाचे उपक्रम 


कार्यक्रम/उत्सव - 

१. नवागतांचे स्वागत
IISc मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हा समारंभ आयोजित करण्यात येतो. सर्वप्रथम मराठी मंडळाची ओळख सर्वांना करून देऊन नव्या सदस्यांना IISc मराठी मंडळ परिवारात सामील करून घेण्यात येते. ह्या समारंभाच्या निमित्ताने नवीन ओळखी होतात. घरापासून दूर आलेल्यांना आपलं माणूस भेटल्याचं समाधान वाटतं. खेळीमेळीच्या वातावरणात जुने सदस्य नव्यांना सामावून घेतात व परिवार दर वर्षी वाढतच राहतो.

२. गणेशोत्सव
सर्वांचा आवडता व मराठी मंडळातर्फे साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा उत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळातर्फे गणेश प्रतिष्ठापना होते. अनेक सदस्य स्वत: झटून गणपतीसाठी आकर्षक आरास तयार करतात. दीड दिवस गणेशमूर्ती बसवून मग विसर्जन करण्यात येते. या उत्सवा दरम्यान होणारा सांस्कृतिक कार्यक्रम हे मोठे आकर्षण असते. मंडळाच्या सदस्यांच्या विविध कला-गुणांना वाव मिळेल अश्या पद्धतीने कार्यक्रमाची आखणी आणि त्याची तयारी करण्यात येते. कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार बनवा ह्यासाठी सहभागी सदस्य अनेक अभिनव कल्पना लढवतात. ह्याशिवाय सर्व सदस्य मराठमोळ्या प्रीतीभोजनाचाही आनंद लुटतात.

३. कोजागरी पौर्णिमा 
अश्विन महिन्यातली पौर्णिमा म्हणजे नुकताच सुरु झालेला हिवाळा आणि चंद्राच्या शीतल चांदण्याची बरसात. हा दिवस मराठी परंपरेप्रमाणे कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो. रात्रीच्या वेळी सर्व जण एकत्र जमतात. दर वर्षी या कार्यक्रमाचे स्वरूप निराळे असते. कधी खेळ, कधी आकाश दर्शन, तर कधी सामाजिक बांधणीच्या कार्यक्रमातून हा दिवस साजरा केलं जातो. तसेच गरम गरम मसाला दुधाचे प्राशन हे या दिवसाचे वैशिष्ट्य.

४. गुढीपाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. ह्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण मंडळातर्फे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रापासून दूर आलेल्या लोकांना मराठी चित्रपट पाहायला मिळणे तसे मुश्कीलच. म्हणून मंडळातर्फे गेले काही वर्ष ह्या सणाचे औचित्य साधून ह्या दिवशी एका मराठी चित्रपटाचा खेळ सर्वांसाठी आयोजित करण्यात येतो. सदस्य आपल्या पारंपारिक वेषात हजेरी लावून ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतात.

५. निरोप समारंभ
संस्थेतील शिक्षण संपवून बाहेर पडणाऱ्या सदस्यांना इतर सदस्यांतर्फे भावपूर्ण निरोप दिला जातो. संस्थेत व्यतीत केलेल्या क्षणांची उजळणी होते. भविष्याकडे नजर ठेऊन मंडळाशी नाळ न तुटू देता सदस्य निरोप घेतात. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आजही मंडळाचे सदस्य असल्यामुळे संपर्कात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा नवीन विद्यार्थी घेऊ शकतात. मंडळाच्या कार्यक्रमांनाही माजी विद्यार्थी आपल्या परीने मदत करतात व शक्य झाल्यास उपस्थितही होतात. 

ह्या सर्व कार्यक्रमांना मिळणारे मराठमोळे खाद्यपदार्थ हे ही एक वैशिष्ट्य असते. 

इतर उपक्रम

- दिवाळी भेटकार्ड विक्री
स्व. बाबा आमटे ह्यांनी कुष्ठरोग्यांच्या कल्याणाकरिता स्थापन 'आनंदवन' ह्या संस्थेला एक मदत म्हणून बेंगळूर मधील सौ. लीलावती भगवंत ह्या गृहिणी स्वकष्टाने दिवाळी भेटकार्ड तसेच पुस्तक-खुणा व इतर कलात्मक वस्तू तयार करतात. त्यांच्या विक्रीतून जमा होणारा संपूर्ण निधी आनंदवन ह्या संस्थेला पाठवण्यात येतो. मराठी मंडळ ह्या उपक्रमामध्ये खारीचा वाट उचलते. दिवाळीपूर्वी संस्थेमध्ये ह्या वस्तूंची विक्री करून निधी जमवून तो आनंदवन कडे पाठवण्यात येतो. आनंदवनच्या कार्यकारींकडून ह्या कार्याची दखल घेतली जाते.

- नाट्य स्पर्धा सहभाग
महाराष्ट्र मंडळ, बेंगळूर तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या नाट्य स्पर्धेत IISc मराठी मंडळ गेली काही वर्षे सातत्याने सहभागी होत आहे. जानेवारी महिन्यात 'रंगदक्षिणी स्पर्धा' व गणेशोत्सव दरम्यान नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात. बेंगळूरमधील तसेच सोलापूर, लातूर इत्यादी ठिकाणाहून येणारे संघ प्रतिस्पर्धी म्हणून लाभतात. या निमित्ताने अभिनय/ संगीत/ हस्तकला अशा विविध कला अजमावण्याची संधी इच्छुक सदस्य घेतात. मंडळाने आतापर्यंत अनेक बक्षिसेही पटकावली आहेत. 

- क्रिकेट सामना
नवीन सदस्य व जुने सदस्य ह्यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात येतो. खेळाच्या निमित्ताने नवे-जुने सदस्य मैदानावर आमने-सामने येतात व हसत खेळत सामना पार पडतो.

- ग्रंथ देणगी
संस्थेमधील रानडे ग्रंथालयामध्ये अनेक मराठी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. अधिकाधिक दर्जेदार पुस्तके सदस्यांना वाचनासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी मंडळातर्फे ह्या ग्रंथालयात दर वर्षी काही पुस्तकांची भर घालण्यात येते.

No comments:

Post a Comment