Wednesday, August 25, 2010

स्वागत समारंभ २०१०

आय आय एस सी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट ला संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. चहापानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अविनाशच्या हस्ते गणेशपूजन झाले. त्यानंतर शंतनुने सर्वांना मराठी मंडळाची ओळख करून दिली.


कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी मराठी मंडळातर्फ़े रानडे ग्रंथालयासाठी ह्या वर्षी ५ पुस्तकांचा संच देणगी म्हणून देण्यात आला. हा संच अमृतच्या हस्ते ग्रंथपालांकडे सुपूर्त करण्यात आला. हृषिकेशने सर्वांना रानडे ग्रंथालय व तेथे उपलब्ध असलेल्या मराठी पुस्तकांविषयी  सर्वांना माहिती दिली.

यानंतर खेळास सुरुवात झाली. समीहन आणि शिल्पाने खेळाचे स्वरूप समजावून सांगितले. पहिल्या खेळामध्ये आपापल्या गटांमध्ये चेंडू फ़िरवायचा होता, आणि गाणे थांबताच ज्याच्याकडे चेंडू असेल त्या सर्वांनी पुढे येऊन एखादी सांगितलेली गोष्ट करून दाखवायची व नंतर आपली ओळख सर्वांना करून द्यायची, असे स्वरूप होते. जसजसे एक एक गडी बाद होत गेले, तसतसे खेळही अवघड होत गेले व उत्कंठा वाढत गेली. सर्वांची ओळख झाल्याबरोबर खेळ संपला.

दुसर्‍या खेळासाठी सर्व गटांना काही सामग्री देण्यात आली. त्यांना चिठ्ठ्यांवर ५ असंबद्ध शब्दही देण्यात आले. हे शब्द जोडून काहीतरी अर्थपूर्ण प्रसंग समोर सादर करायचा होता. ह्याच्या तयारीसाठी २० मिनिटे वेळ देण्यात आला. सर्वांनी आपल्यामधला कलाकार पणाला लावून शक्कली लढवल्या.
वेळ संपताच एकेका गटाने प्रसंगाचे सादरीकरण केले. त्यातील प्रासंगिक विनोदांचा सगळ्यांनीच आनंद लुटला. शेवटी विजेत्या गटाला बक्षिस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी नारळीपोळी, भजी असा बेत होता. त्यांवर ताव मारून, पुन्हा कायम भेटत राहण्याच्या इराद्यानेच सगळे परतले.

Saturday, August 7, 2010

क्रिकेट सामना व निरोप समारंभ २०१० वृतांत

१२ जून २०१० ह्या दिवशी सकाळी 'जुनियर विरुद्ध सिनियर' असा क्रिकेट सामना, आणि संध्याकाळी निरोप समारंभ पार पडला. सकाळी १० वाजता सामन्यास सुरुवात झाली. पावसाचे सावट होतेच. जुनियर संघाचा कप्तान कृष्णा आणि सिनियर संघाचा कप्तान पवन यांच्यामध्ये नाणेफेक झाली. जुनियर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ह्या संघाकडून कृष्णा, हृषिकेश, ऋषिकेश, हर्षवर्धन इत्यादींनी चांगला खेळ केला, परंतु त्यांचे एकेक फलंदाज सिनियर संघाच्या मार्‍यापुढे बाद होत गेले आणि त्यांनी सिनियर संघासमोर १३८ धावांचे आव्हान ठेवले. सिनियर संघाकडून पवन, हृषिकेश, अनुप, सौरभ इत्यादींनी उत्तम गोलंदाजी करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले.

सिनियर संघ फलंदाजीस उतरला तोच एक नवा विश्वास घेऊन. कप्तान पवन आणि पल्लवी प्रथम फलंदाजीस उतरले. जुनियर संघाने गोलंदाजीचा केलेला मारा पवनने लीलया परतवून अनेक वेळेस चेंडू सीमापार धाडला. पल्लवीला बाद करण्याचे जुनियर संघाचे इरादेही निष्फल ठरले. तिने एकाच ठिकाणी उभे राहून प्रसंगी वेगवान चेंडूंचा मारा आपल्या अंगावर घेत प्रतिस्पर्धी गोलंदाजीला तोंड दिले व अधून मधून काही टोलेही लगावले. अश्या प्रकारे सिनियर संघाने एकही खेळाडू बाद न होऊ देता जुनियर संघाचा दारूण पराभव केला. ह्यानंतर काही जणांनी कंटाळून मिश्र-संघ-रचनेचा प्रस्ताव मांडला, व त्याप्रमाणे खेळास सुरुवातही झाली, पण अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची निराशा झाली.

ह्यानंतर संध्याकाळी निरोप समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात मंदारच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. ह्या कार्यक्रमामध्ये एक सापशिडीचा खेळ व त्याला जोडून इतर छोटे खेळ अशी रचना होती. आलेल्या सर्व उपस्थितांमध्ये गट पाडण्यात आले, व प्रत्येक गटातला एकेक जण पायर्‍यांवर आखलेल्या 'गणितीय' सापशिडीवर आपल्या संघाच्या दानावर उभा राहिला. ह्यानंतर छोटे छोटे खेळ आणि 'टेट्राहेड्रल' फास्यांचे दान ह्यांमधून खेळ पुढे जात राहिला. शेवटी विजयी संघाची घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी अमृतच्या हस्ते निमंत्रितांना भेटवस्तू आणि भेटकार्डे देऊन औपचारिक निरोप देण्यात आला. सर्वांनी निरोप घेताना आपल्या भावनांना वाट करून दिली व आपल्या भविष्यातील कल्पनांबाबतही सर्वांना माहिती दिली. सर्वांनी निरोपार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच संपर्कात राहण्याविषयीही आश्वासन दिले. निरोपार्थींची संख्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी होती, परंतू खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या कार्यक्रमामुळे सर्वांनाच मजा आली.

गुढीपाडवा २०१० वृत्तांत

मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा उत्सव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी उत्साहात पार पडला. ह्या निमित्ताने CHEP Seminar Hall मध्ये 'तो मी नव्हेच' ह्या प्रसिद्ध नाटकाची ध्वनी-चित्र-चकती (VCD) दाखवण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गणित विभागाच्या पाटील सरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शंतनुने गुढीपाडव्याविषयी थोडक्यात माहिती देऊन त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. ह्यानंतर नाटक दाखवण्यात आले. प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेमधून उलगडत जाणार्‍या गोष्टी आणि विनोदांची पखरण, लखोबा लोखंडे ह्या पात्राने न्यायालयात दिलेला कबुलीजबाब, साक्षी-पुरावे, राधेश्याम महाराजांचे प्रवचन ह्या सर्वांमुळे खूप मजा आली. मध्यंतरामध्ये पुरी-भाजी, गुलाबजाम असा अल्पोपाहाराचा बेत होता.

सभागृहाच्या बाहेर काढलेल्या आकर्षक रांगोळीनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला सुमारे ८० लोक पारंपारिक रंगीबेरंगी पोषाखात उपस्थित होते.